Ad will apear here
Next
ऐसी कळवळ्याची जाती...
चारुदत्त सरपोतदार यांना ८६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेल्या वर्षी पुण्यात संवाद संस्थेने त्यांचा सत्कार केला होता.गेली अनेक वर्षं ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे आणि  गेल्या तीन पिढ्यांमधील नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातील घरचा हक्काचा माणूस’ असलेले चारूकाका अनेकांसाठी आयुष्याचा आधारस्तंभ बनले आहेत. त्यांचा चवीपासून सामाजिक कार्यापर्यंतचा वारसा आजही जपलाय आणि त्याचा आलेख चढता वाढता ठेवलाय तो त्यांचे पुत्र किशोर सरपोतदार यांनी! ... ‘वटवृक्षाच्या छायेत’ या लेखमालेत आजचा लेख किशोर सरपोतदार-चारुदत्त सरपोतदार यांच्याबद्दल...
.......................
भारतीय संस्कृतीमध्ये अन्नदान हे सर्वांत श्रेष्ठ दान मानले गेले आहे. येणाऱ्या अतिथीला देव मानून त्याला पोटभर जेवायला घालणं ही संस्कृती आपण युगानुयुगे जपली. बदलत्या काळात त्याचं स्वरूप बदलत गेलं असलं आणि अतिथी आणि याचकाच्या जागी ग्राहक आले असले, तरी त्यांना जेवायला घालून तृप्त करणं यामध्ये असलेला आंतरिक जिव्हाळा आणि आत्मीयता मात्र कायम आहे. किंबहुना आता या गोष्टीला व्यावसायिक स्वरूप आलं असलं, तरी त्याचा आधार मात्र अजूनही आत्मीयता हाच आहे. 

‘साऱ्यांच्या रसनेस तृप्त करणे। जेवू तया घालुनि।
नाही याहून पुण्यकर्म दुसरे। मोठे मुळी जीवनी॥’

या काव्यपंक्ती ज्यांना तंतोतंत लागू पडतात, असं पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व म्हणजे चारुदत्त सरपोतदार. गेली सुमारे सत्तर वर्षं ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारूकाका आजही पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. गेल्या तीन पिढ्यांमधील नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातील घरचा हक्काचा माणूस’ असलेले चारूकाका अनेकांसाठी आयुष्याचा आधारस्तंभ बनले आहेत. त्यांचा चवीपासून सामाजिक कार्यापर्यंतचा वारसा आजही जपलाय आणि त्याचा आलेख चढता वाढता ठेवलाय तो त्यांचे पुत्र किशोर सरपोतदार यांनी! ते म्हणाले, ‘बाबांनी व्यवसायात कधी धंदा पाहिला नाही. त्यांच्यासाठी त्यामध्ये सामाजिक बांधिलकी जास्त जपली. त्यामुळे विविध स्तरांतील हजारो माणसं ‘पूना गेस्ट हाउस’शी जोडली गेली. संस्थेसाठी जोडली गेलेली माणसं हेच सर्वांत मोठं भांडवल असतं. आजही त्यांची परंपरा आणि नीतिमूल्यं कायम ठेवून, त्यांनी घालून दिलेले काही पायंडे जपत आमची वाटचाल सुरू आहे.’ 

कर्तृत्वाचं वरदान लाभलेलं हे सरपोतदार कुटुंब मूळचं रत्नागिरीजवळच्या नांदिवली - अंजणारी गावचं! या गावांमध्ये फक्त आणि फक्त सरपोतदारच राहतात. यातले नानासाहेब सरपोतदार म्हणजे किशोर सरपोतदारांचे आजोबा कलेवरील प्रेमापोटी १९३५मध्ये पुण्यात आले. त्यांनी जुन्या पेशवे पार्कशेजारी मूकपटनिर्मितीसाठी ‘आर्यन फिल्म स्टुडिओ’ सुरू केला. या चित्रपटांचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक अशा सर्व जबाबदाऱ्या ते स्वत: सांभाळत. यामध्ये त्यांनी पन्नासहून अधिक मूकपटांची निर्मिती केली. त्यामधील ‘महाराचे पोर’ हा मूकपट तब्बल २५ आठवडे चालला. बहुजन समाजाविषयी बनविला गेलेला हा पहिला चित्रपट! पण या सगळ्या उद्योगाचा उपजीविकेचं साधन म्हणून फारसा उपयोग होईल, असं त्यांना वाटेना. त्यामुळे कोल्हापुरात खानावळ चालविणाऱ्या सरस्वतीबाई या बहिणीच्या मदतीनं त्यांनी पुण्यात हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. त्यातून ‘पूना गेस्ट हाउस’ची पायाभरणी झाली. त्या वेळी आधुनिकतेची कास धरल्याचं प्रतीक म्हणून ‘पूना रिफ्रेशमेंट हाउस’ हे उपाहारगृह आणि निवासाची व्यवस्था असलेलं ‘पूना गेस्ट हाउस’ ही दोन्ही नावं इंग्रजीमध्ये दिली गेली. पुढे त्यांचे चिरंजीव बंडोपंत यांनी हा व्यवसाय खऱ्या अर्थानं वाढवला. नानासाहेबांनी पुण्यात जेवणासाठी पहिल्यांदा स्टीलच्या थाळीचा वापर केला. आणि सरस्वतीबाईंनी मुलींचं पहिलं वसतिगृह सुरू केलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बंडोपंतांनी माथेरानमध्ये ‘पूना गेस्ट हाउस’ सुरू केलं. या काळात उद्योगपती गरवारे, किर्लोस्कर या मित्रमंडळींची त्यांना मदत झाली. ते त्यांनी ४४ वर्षं चालवलं. आता त्याचं व्यवस्थापन दिवाडकर बघतात. पुण्यात त्या वेळी मास्टर विठ्ठल, विनायक, पृथ्वीराज कपूर, बालगंधर्व, भालजी पेंढारकर आदी मंडळी सरपोतदारांकडे मुक्कामाला असत. 

पुढे यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ आणि ग. दि. माडगूळकर यांनी आग्रहानं बंडोपंतांना दिल्लीला नेलं आणि ‘पूना गेस्ट हाउस’ची ध्वजा दिल्लीमध्येही फडकली. ते दिल्लीतल्या मराठी माणसांसाठी सांस्कृतिक केंद्र बनलं. त्यांनी तिथं ‘दिल्ली दरबार’ हे मुखपत्र सुरू केलं. ‘पूना गेस्ट हाउस’ सुमारे साठ वर्षं, तर दिल्ली विधानसभेचं कँटीन बंडोपंतांनी २५ वर्षं चालवलं. 

त्या सुमाराला चारूकाकांचं भोसला मिलिटरी स्कूलमधील शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांनी पुण्यात येऊन आजीबरोबर व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांची बहीण उषा अनेक मराठी नाटकांमधून भूमिका करत होती. पुढे त्या राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्थेच्या ‘एनएसडी’च्या संचालिका (विवाहानंतरच्या उषा बॅनर्जी) झाल्या. किशोर सरपोतदार म्हणाले, ‘बंडोपंतांसह विश्वास, गजानन आणि चारूकाका या सगळ्या भावंडांची पहिली आवड चित्रपट हीच होती. बंडोपंतांचं ‘ताई तेलीण’ या चित्रपटात मोठं नुकसान झालं. ‘घर गंगेच्या काठी’, ‘जावई माझा भला’ हे बाबांनी काढलेले चित्रपट विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले; पण निर्माते आणि वितरक म्हणून सर्वांत यशस्वी ठरले ते विश्वास सरपोतदार. त्यांच्या ‘हीच खरी दौलत’, ‘रंगल्या रात्री अशा’ आदी चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यांची या क्षेत्रात घोडदौड सुरू राहिली आणि बाबांनी ‘पूना गेस्ट हाउस’वर लक्ष केंद्रित केलं. 

त्या वेळी कोणत्याही कारणास्तव पुण्यात येणाऱ्या नाट्य-चित्रपट कलावंतांसाठी ‘पूना गेस्ट हाउस’ हे वास्तव्याचं एकमेव ठिकाण होतं. या कलावंतांना तिथं घरचं प्रेम मिळालं. येणाऱ्या प्रत्येक कलावंताची आवडनिवड चारूकाका आणि आजींच्या लक्षात असायची. ज्याला जे हवं, जे आवडतं, ते न मागता अनपेक्षितरीत्या समोर आलं, की मंडळी खूश होऊन जायची. डॉ. काशिनाथ घाणेकरांना प्रयोग संपवून रात्री आलं, की झोपण्यापूर्वी दूधभात लागायचा. ते ‘गेस्ट हाउस’वर यायच्या वेळी आजीचा गरम गरम मऊ भात तयार असायचा. अशा येणाऱ्या कलावंतांच्या आवडीनिवडी या मायलेकांना ठाऊक असायच्या आणि त्या न चुकता पुरविल्या जायच्या; पण हे सगळं फक्त कलावंतांसाठीच होतं असं नाही. सर्वसामान्य माणसाबद्दलही चारूकाकांना हीच आत्मीयता आणि अगत्य आहे. किशोर सरपोतदार म्हणाले, ‘पानशेतचा प्रलय झाला त्या वेळी पुण्यात सगळीच दुर्दशा झाली होती. त्या वेळी चारूकाकांनी महिनाभर पुणेकरांसाठी मोफत अन्नछत्र चालवलं. चिनी युद्धानंतर तांदळाचा तुटवडा होता. फार थोडे तांदूळ रेशनवर मिळायचे. त्या वेळी मर्यादित थाळीची ‘राइस प्लेट’ची पद्धत प्रथम ‘पूना गेस्ट हाउस’मध्ये सुरू झाली. मासिक पासधारक मंडळी होतीच. ‘सरस्वती मूव्हीटोन’, ‘प्रभात’च्या चित्रपटांच्या शूटिंगनिमित्तानं येणारी कलावंत मंडळीही होती; पण चारूकाकांचा एक दंडक होता. कुणीही कलाकार मंडळी कितीही दिवस राहिली, जेवली, तरी त्यांना पैशाबद्दल काहीही विचारायचं नाही. ही मंडळी त्यांच्या उत्पन्नानुसार जे देतील, ते गोड मानून घ्यायचं. चारूकाकांच्या या स्वभावामुळे अनेक मंडळी ‘पूना गेस्ट हाउस’शी जोडली गेली. आमच्या घरातली होऊन गेली. आजी या सगळ्यांचीच आई होऊन गेली.’ 
चारूकाकांच्या आत्मीयतेविषयीचा एक प्रसंग आवर्जून सांगण्यजोगा आहे. पानशेतचा प्रलय झाला त्या वेळी अभिनेत्री सुलोचनाबाई पुण्यात होत्या. त्यांना मुंबईला जायचं होतं; पण सगळे रस्ते बंद होते. आता काय करावं, ते न सुचून त्या ‘पूना गेस्ट हाउस’वर आल्या. त्यांचा मुंबईला परतायचा विचार ऐकून अस्वस्थ झालेले चारूकाका अक्षरश: त्यांच्या अंगावर ओरडले नि म्हणाले, ‘कुणीही कुठंही जायचं नाही इथून. निमूटपणे राहा इथं सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत!’ सुलोचनाबाईंना चारूकाकांच्या मनातली काळजी, प्रेम, जिव्हाळा सारं काही त्या स्वरातून समजलं नि तेव्हापासून चारूकाका त्यांचे भाऊ होऊन गेले!

सार्वजनिक जीवनातही चारूकाकांनी फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. अनेक नवनव्या गोष्टी केल्या; पण प्रसिद्धी, लौकिकाची कसलीही अपेक्षा न ठेवता पुणे महापालिका होण्याआधी पुण्यातल्या खानावळी, ‘अमृततुल्य’चे मालक, चहाची छोटी गाडी चालवणारे विक्रेते या सर्वांचा मिळून ‘खाद्य-पेय विक्रेते संघ’ त्यांनी स्थापन  केला. गेली ४८ वर्षं ते त्याचे अध्यक्ष आहेत. अनाथ मुलांसाठी ससून परिसरात सुरू असलेली ‘श्रीवत्स’ ही पहिली संस्था स्थापन झाली ती चारूकाकांच्या पुढाकारानं! चित्रपट क्षेत्रातील मंडळींचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असावं म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना करण्यामध्ये सुधीर फडके, विनायकराव सरस्वते यांच्याबरोबर मोठा सहभाग होता तो चारूकाकांचाच! मराठी कलावंतांचा पहिला सामूहिक परदेश दौरा त्यांनीच घडवून आणला. या कलावंतांची सामूहिक वसाहत असावी, त्यासाठी त्यांना सुलभ हप्त्यानं कर्ज उपलब्ध व्हावं, ही कल्पनाही त्यांचीच! त्यातूनच पुण्यात सातारा रस्त्यावर ‘कलानगर’ वसवलं गेलं. त्याचं भूमिपूजन सी. रामचंद्र यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पुणे विद्यापीठाचं आणि रिझर्व्ह बँक ट्रेनिंग कॉलेजचं कँटीन कितीतरी वर्षं चारूकाका चालवीत होते. कराडे ब्राह्मण महासंघ, हिंदू महासभा यांचंही कामकाज ते पाहात होते; पण ही सगळी कामं करताना येणाऱ्या पैशाला कधी पाय फुटायचे ते कळायचंही नाही. त्याची झळ संसाराला बसू नये म्हणून त्यांच्या पत्नी चारूशीलाताई प्रभात रोडवर राहत्या घरी मेस चालवत. दीडशे लोक रोज जेवायला असायचे. घरी पेइंग गेस्ट ठेवले होते. ते उत्पन्न चरितार्थासाठी उपयोगी पडायचं. 

किशोर सरपोतदार यांच्या फेसबुक वॉलवरून साभार...चारूकाकांची समाजाभिमुखता, कलाप्रेम, बांधिलकी, अगत्य या साऱ्याचाच वारसा किशोर सरपोतदारांनी त्याच जिवाभावानं सांभाळलाय. एमबीए पदवी मिळवलेली असताना त्यांना चारूकाकांच्याच वाटेनं का जावंसं वाटतं? घरचा व्यवसाय म्हणून ते अपरिहार्य होतं का? किशोर सरपोतदार म्हणतात, ‘पूना गेस्ट हाउस, तिथलं वातावरण या सगळ्याचा माझ्यावर विलक्षण पगडा होता. त्यामुळे मेडिकल, इंजिनीअरिंगला जाण्याइतके गुण असतानाही मॅनेजमेंटला गेलो. काहीही व्यवसाय करायला ते उपयोगी पडेल असं वाटलं आणि मग घरच्याच व्यवसायात लक्ष घातलं. काळाची गरज ओळखून ‘पूना गेस्ट हाउस’च्या अल्पोपाहार उपाहारगृहात काही बदल केले. पंजाबी डिशेस, ग्रामीण थाळी, भरलं वांगं, भाकरी, भाजणीचं थालीपीठ-लोणी अशा डिशेस सुरू केल्या. त्यामुळे प्रतिसाद वाढला.’ 

नवनव्या गोष्टी करण्याचा, आव्हानं स्वीकारण्याचा चारूकाकांचा वारसाही त्यांनी आत्मसात केलाय. त्यामुळे अनेक मोठ्या कार्यक्रमांना केटरिंगची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. तळजाई पठारावर ४० हजार स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर असो, ‘उंबरठा’चं शूटिंग असो, की ‘जाणता राजा’चे राज्यभरातील प्रयोग असोत; खानपान व्यवस्थेसाठी किशोर सरपोतदार हे एकमेव नाव असतं. राजीव गांधी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या उपस्थितीत पुण्यात एक मोठा कार्यकर्ता मेळावा झाला. त्या वेळी १५ हजार लोकांना एका वेळी बुफे - तोही पुण्यात पहिल्यांदाच पुरविण्याचा पराक्रम सरपोतदारांनी केला. अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कलावंतांना जेवू घालणाऱ्या किशोर सरपोतदारांनी १९८५मध्ये देशातला पहिला ‘फूड फेस्टिव्हल’ फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर आयोजित केला. शंभरहून अधिक पदार्थ आणि हुरड्यापासून चायनीजपर्यंत अशी रेंज असलेल्या या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि यातून मिळालेल्या उत्पन्नातील एक लाख रुपये ‘श्रीवत्स’ला दिले गेले. आजही चारूकाकांची परंपरा कायम राखत केईएम रुग्णालयातील वीस गरीब रुग्णांचे रोजच्या जेवणाचे डबे इथून मोफत पुरविले जातात. चारूकाकांनी स्वत:च्या मुलांच्या मुंजी करताना चार अनाथ मुलांच्या मुंजी केल्या. शहरातील कुठल्याही समारंभ-कार्यक्रमात जेवणावळीनंतर अन्न शिल्लक राहिल्याचा निरोप मिळाला तर स्वखर्चानं वाहतूक व्यवस्था करून ते गरिबांना वाटण्याचं काम किशोर सरपोतदार करतात. या एका वेळच्या कामाला सुमारे साडेचार हजार रुपये खर्च येतो; पण शे-दोनशे लोकांचं पोट भरल्याचं समाधान त्यांच्यासाठी मोठं आहे. ‘एमसीसीआय’चे सर्व उपक्रम, कन्स्ट्रो, एक्सपो, महाटेक, किसान अशा मोठमोठ्या उपक्रमांमध्ये केटरिंगची सारी व्यवस्था सरपोतदारांकडेच असते. सामाजिक बांधिलकी आणि रोजीरोटीसाठीचा व्यवहार यांचा उत्तम समन्वय साधण्यात त्यांना यश आलं आहे. 

किशोर सरपोतदार म्हणाले, ‘आपल्या उत्पन्नातील काही वाटा अशा विधायक कामांसाठी वापरावा, ही एक प्रकारे आमची परंपराच आहे. मीही अनेक संस्थांसाठी काम करतो. अनेक संस्थांच्या उभारणीला हातभार लावला आहे; पण चारूकाकांच्या एकाही संस्थेत मी नाही. ‘प्रिझम ट्रस्ट’तर्फे आम्ही पुण्यात मतिमंद मुलांची शाळा चालवतो. ‘रेडक्रॉस’ची महाराष्ट्र शाखा, स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व समिती, केटरिंग असोसिएशन, पूना रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन, हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड असोसिएशन या सस्थांचे काम मी करतो.’ 

सरपोतदार बंधूंतर्फे कामशेत रस्त्यावर सध्या वृद्धाश्रम उभारणीचे काम सुरू आहे. समाजाच्या स्वास्थ्यासाठी आपला हातभार लागावा, एवढी एकच तळमळ त्याच्या पाठीशी आहे. सरपोतदार म्हणाले, ‘चारूकाकांचे संस्कार, त्यांचं माणसं जोडणं, प्रत्येकाला आपल्या परिवारातलं मानणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाचं नितळपण दाखवून देतात. मी काम करताना त्यांचं घातक ठरू शेकल असं काहीसं अव्यवहारीपण बाजूला सारून बाकी साऱ्या गोष्टी तशाच घेतल्या. त्यांचे संस्कार जपले, आचरणात आणले. येणाऱ्या माणसाला देव समजून आनंदानं चांगलं खायला घाला. त्यातून मिळणारं समाधान अवर्णनीय असतं. हे चारूकाकांचं सांगणं माझ्या मनात कायम जागं असतं. त्यामुळेच नवं काम धडाडीनं करण्याची, नवं धाडस करण्याची ऊर्जा मला मिळते नि मी पुन्हा एकदा ताजातवाना होतो.’
 
येणाऱ्या प्रत्येक माणसाला चवीचं खायला घालून तृप्त करणारे, सार्वजनिक जीवनातच स्वत:चं जगणं शोधणारे चारूकाका म्हणजे तुकोबांच्या अभंगातील ‘लाभाविण प्रीती’ करणारी ‘कळवळ्याची जाती!’ त्यांचं ते जगणं आत्मसात करून त्यामध्ये स्वत:ची थोडी चव मिसळत, स्वत:बरोबरच अनेकांचं जीवन स्वादिष्ट नि लज्जतदार बनविणारे किशोर सरपोतदार हे म्हणूनच चारूकाकांचे खरेखुरे वारस आहेत!

- स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७

(लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)
(‘वटवृक्षाच्या छायेत’  ही लेखमाला दर रविवारी प्रसिद्ध होते.)

(पूर्वप्रसिद्धी : समाज प्रतिबिंब दिवाळी अंक २०११.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYYTBD
Similar Posts
‘लोकांसाठी काम करणं हाच बाबांचा संस्कार’ सध्या राज्याच्या महिला-बालकल्याणमंत्री असलेल्या पंकजा मुंडे-पालवे आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करत आहेत. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या लेखमालेत आज पंकजा मुंडे-पालवे आणि त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकणारा पूर्वप्रकाशित लेख...
‘दुसऱ्याची प्रतिष्ठा जपणं महत्त्वाचं!’ दुसऱ्याची प्रतिष्ठा जपणं, हे ना. सी. फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं आणि तो संस्कार आमच्यावरही झाला, असं त्यांची कन्या सांगते. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या लेखमालेत आज साहित्यिक ना. सी. फडके आणि त्यांची कन्या गीतांजली जोशी यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकणारा लेख...
वटवृक्षाच्या छायेत... आज जून महिन्याचा तिसरा रविवार, अर्थात फादर्स डे. आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याची सुरुवात प्रामुख्याने पाश्चात्य देशांत झाली असली, तरी आज जगभरात अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो आणि त्याला भारतही अपवाद नाही. या दिनाचे औचित्य साधून ‘वटवृक्षाच्या छायेत’ ही विशेष लेखमाला ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर सुरू करत आहोत
‘सच्च्या दिलाचा माणूस’ ‘अभिनय क्षेत्रात काम करताना वडिलांचा वारसा आणि त्यांनी या क्षेत्रात व्यतीत केलेले भलेबुरे क्षण एखाद्या पुस्तकासारखे सोबत होतेच. ते वेळोवेळी यात दिशा दाखवत राहिले. माझे वडील अत्यंत सच्च्या दिलाचे होते,’ हे म्हणणं आहे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या सदरात आज ज्येष्ठ अभिनेते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language